Monsoon Update: यागी वादळानंतर ‘ला निना’चा प्रभाव; मान्सून परतीचा प्रवास उशिराने सुरू होणार
महाराष्ट्र हवामान अंदाज:मान्सून परतीचा प्रवास उशिराने Monsoon Update
महाराष्ट्र हवामान अंदाज: भारतीय हवामान विभागाने (IMD) 2024 च्या मान्सूनसंदर्भात Monsoon Update महत्त्वपूर्ण अपडेट दिली आहे. सध्या मान्सून आपल्या अंतिम टप्प्यात असून, त्याच्या परतीच्या प्रवासाची तयारी सुरु झाली आहे.
दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो. मात्र, यावर्षी परिस्थिती वेगळी आहे. 2023 मध्ये महाराष्ट्रासह संपूर्ण देशात पावसाचे प्रमाण कमी होते, पण यंदा पावसाने भरपूर साथ दिली आहे. मान्सूनच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांमध्येचं राज्यात दमदार पावसाची नोंद झाली आहे.
सप्टेंबरची दमदार सुरुवात
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाही राज्यात जोरदार पाऊस पडला आहे. 1 सप्टेंबर ते 3 सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागांत पावसाची जोरदार नोंद झाली. त्यानंतर पावसाने काही काळ विश्रांती घेतली. मात्र, गणेश चतुर्थीच्या आसपास पुन्हा एकदा पावसाची पुनरावृत्ती झाली. 7 ते 10 सप्टेंबर दरम्यान पावसाने चांगलाच जोर धरला. सध्या राज्यातील पावसाचा जोर थोडासा कमी झाला आहे.
यागी वादळ आणि परतीचा मान्सून
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र विरल्याने राज्यातील पावसाची तीव्रता कमी झाली आहे. हवामान विभागाच्या मते, आगामी काही दिवसांत राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहील. मात्र, भारतीय हवामान विभागाने यंदाच्या मान्सूनसाठी नवीन अंदाज जाहीर केला आहे. साधारणपणे सप्टेंबरच्या अखेरीस मान्सून परततो, पण यंदा ‘यागी’ चक्रीवादळामुळे परतीचा प्रवास लांबणार आहे.
2023 मध्ये मान्सूनने 25 सप्टेंबरला निरोप घेतला होता, परंतु यंदा मान्सून 25 ऑक्टोबरपर्यंत थांबण्याची शक्यता आहे. ‘ला निना’ या हवामान स्थितीमुळे या वर्षी हिवाळ्यातील तापमान घटण्याची शक्यता हवामानतज्ञांनी व्यक्त केली आहे.
हिवाळ्याचे पूर्वानुमान
2024-25 हिवाळ्यात ‘ला निना’चा प्रभाव 60% पर्यंत वाढण्याची शक्यता जागतिक हवामान संघटनेने वर्तवली आहे. यामुळे यावर्षीची थंडी अधिक तीव्र असू शकते. त्यामुळे या वर्षीचा हिवाळा कडाक्याचा असेल असा अंदाज व्यक्त होत आहे.