Shetkari Yashogatha: पारंपरिक शेतीला तिलांजली देत भाजीपाला शेतीतून लाखोंचा नफा, परभणीतील प्रयोगशील शेतकऱ्याची कहाणी
Parbhani News: परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातील संदलापूर येथील विठ्ठल गणेशराव काकडे यांनी पारंपरिक शेती सोडून भाजीपाला शेतीकडे वळून आर्थिक उन्नतीचा मार्ग धरला आहे. पारंपरिक पिकांपेक्षा अधिक नफा मिळवण्यासाठी त्यांनी भाजीपाला शेतीत नवनवीन प्रयोग केले आहेत. आजकालच्या शेतीत विक्रीक्षम पिकांची निवड करणे आवश्यक झाले आहे, असे काकडे सांगतात. कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पन्नात वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाकडून प्रोत्साहन मिळत आहे. Shetkari Yashogatha
विठ्ठल काकडे यांनी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेत आपल्या शेतात सौर पंप बसवला. त्यामुळे त्यांना दिवसा शाश्वत सिंचनाची सुविधा मिळाली. त्याचा लाभ घेत त्यांनी आपल्या शेतात कारले, दोडके, टोमॅटो, कोबी, कांदा आणि लसूण यांसारख्या विविध भाजीपाला पिकांची लागवड केली. रासायनिक खतांचा कमी वापर करत, कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवणे हे त्यांचे मुख्य ध्येय आहे.
आणखी पाहा : flower farming: फुलशेतीचा यशस्वी प्रयोग: गजानन माहुरेंची यशोगाथा,आता कमवताय लाखों रुपये
कांद्यामध्ये मिरचीचे मिश्र पीक
विठ्ठल काकडे यांनी भाजीपाला शेतीतून आतापर्यंत कारले पिकातून 1.12 लाख रुपये, दोडके पिकातून दीड लाख रुपये, तर टोमॅटो पिकातून 2.5 लाख रुपये निव्वळ नफा कमावला आहे. त्यांनी त्यांच्या दीड एकर शेतात कारल्याच्या लागवडीसह कांद्यामध्ये मिरचीचे मिश्र दुहेरी पीक घेतले आहे. यावर्षी ते कांद्याचे उत्पादन 200 कट्टे अपेक्षित करत असून, गावोगावी जाऊन स्वतःच कांद्याची विक्री करत आहेत. याप्रकारे कांद्याच्या विक्रीतून त्यांना चांगला नफा मिळत असल्याचे ते सांगतात.
पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञान
विठ्ठल काकडे हे तालुक्यातील एक आदर्श प्रयोगशील शेतकरी मानले जातात. ते दरवर्षी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करत असतात. कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेत त्यांनी आपले शेतीत उत्पन्न वाढवले आहे. कृषी प्रदर्शन, कृषी महोत्सवांमध्ये भाग घेऊन ते शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती घेत असतात. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असल्याचे ते सांगतात.
काकडे यांचा सल्ला इतर शेतकऱ्यांना असा आहे की, पारंपारिक शेतीसोबत भाजीपाला शेती व फलोत्पादनासारख्या जोडधंद्यांचा अवलंब करून शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. यामुळे शेतीचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.