“ज्यांना सख्खे भाऊ नाही समजले, त्यांना ‘लाडकी बहीण’ काय कळणार?” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला!
Maharashtra Politics: महाराष्ट्रातील राजकारणात सध्या मोठी चर्चा सुरू आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे की, “ज्यांना सख्खे भाऊ नाही समजले, त्यांना लाडकी बहीण योजना काय कळणार?”
Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय म्हटलं?
विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “काही लोकांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली. लाडक्या बहिणींसाठी योजना आणली, मग लाडक्या भावाचं काय? असं काही जणांनी विचारलं. मात्र, ज्यांना सख्खे भाऊ कधी समजले नाही, त्यांना लाडकी बहीण योजना कशी समजणार?”
Maharashtra Politics: लाडक्या भावांचा विचार
मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले, “आम्ही लाडक्या बहिणीबरोबरच लाडक्या भावांचादेखील विचार केला आहे. जे तरुण विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून नोकरी शोधत आहेत, त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून पहिली नोकरी देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. राज्यातील १० लाख विद्यार्थांना याचा फायदा होणार आहे. हा ऐतिहासिक निर्णय आहे.”
Maharashtra Politics: विरोधकांची टीका आणि मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया
“आमच्या निर्णयामुळे अनेकांच्या पोटात दुखायला लागलं आहे. आम्ही अन्नपूर्ण योजना सुरू करून महिलांची चिंता दूर केली आहे. त्याबरोबरच आम्ही मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय आम्ही पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीनाही अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही हे ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर अनेकांच्या पोटात दुखायला लागलं आहे. विरोधकांनी चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे,” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
Maharashtra Politics: उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीका केली होती. यावेळी बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजनेवरही प्रतिक्रिया दिली होती. “राज्य सरकार लाडकी बहीण योजना आणत असेल तर त्याचं आम्ही स्वागतच करु, पण लाडक्या बहिणीबरोबरच लाडका भाऊ योजना सुद्धा सरकारने आणावी. तसेच महिला आणि पुरुष असा भेदभाव न करता दोघांना समान न्याय द्या,” असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.